Sunday, January 7, 2018

सासूबाई झिंदाबाद


नेहमी आपण बायकोवर व तिच्या माहेरच्यांवर विनोद करतो... आज जरा सासरच्यांकडे पाहूया 😀😀
लग्नाआधी😎 प्रत्येक मुलीने हे पाठ करून ठेवावे व नंतर 😣😣😉 सतत मान्य करत राहावे. 😄😂
जगातील सर्वात कर्तृत्ववान पुरुष म्हणजे , "माझा मुलगा " असे सासू म्हणते... 😛
जगातील सर्वात आदर्श व प्रेमळ आई- बाप फक्त आपल्या पतिदेवाचे. 😆
जगातील सर्वात सहनशील स्त्री असेल तर फक्त आपल्या नणदेची आई, आपली सासूच... 😌
जगातील सर्वात सुगरण, गृहकृत्यदक्ष स्त्री म्हणजे कोण?? आपल्या सासऱ्याची बायको... सासूचं हो, अजून कोण??🙄
जगातील सर्वात समजूतदार दानशूर व व्यवहारी माहेर म्हणजे आपल्या नणंदेचे. 😂😂
जगातील सर्वात प्रेमळ नातेवाईक, ज्यांनी कधी, काहीच चुका नाही केल्या व करणाराही नाहीत, ते म्हणजे सासूच्या माहेरचे... 😊😊😊
पण सर्वात महत्वाची गोष्ट विसरलोच...
जगातील सर्वात वाईट सासर😥 हे फक्त सासूच्या आणि नणंद असेल तर तिच्याच नशिबात असते.... 😪😯😌🙄😂
😂😂😂😂😂


Wednesday, November 8, 2017

दोन बायका भाजी करताना काय होते नक्की वाचा खूप इंटरेस्टिंग आहे...

दोन बायका भाजी करताना काय होते नक्की वाचा खूप इंटरेस्टिंग आहे...
दोन बायका स्वयंपाक करत असतात... 😜😜
पहिली बाई: फोडणी देताना मी पहिले मोहरी टाकते. 
दुसरी बाई: अगं मी तर पहिले काडिपत्ते  टाकते त्याने छान फ्लेवर येतो. 
पहिली बाई: अगं पण ते जळतात त्या पेक्षा ना सर्वात लास्ट ला टाकत जा फोडणीत. 
दुसरी बाई: हो मी लास्ट ला पाणी टाकते थोडेसे म्हणजे जळत नाही फोडणी. 
शेवटी कशी बशी फोडणी टाकून झाली की, पहिली बाई भाजी टाकू लागते,
दुसरी बाई: अंग भाजी नीट चिरली नाही गेलीये, जरा बारीक हवी होती. 
पहिली बाई: मला वाटले जरा मोठे काप असले की शिजल्यावर एक्दम लगदा नको ना व्हायला, म्हणून असे कापले. 
भाजी मिक्स केल्यावर, पहिली बाई झाकण ठेवते... 
दुसरी बाई: अगं झाकण इतक्या लवकर नको ठेवत जाऊ, थोडे शिजू देत जा, मग ठेव. 
पहिली बाई: उलट लवकर ठेवावे म्हणजे गॅस वाया जात नाही. 
शेवटी भाजी तयार होते मग सर्व खायला बसतात, "भाजी उत्तम झालीये" असे ऐकायला मिळते. 
" मग ही  भाजी वाटते तितकी सोपी नाहीये." , पहिली बाई म्हणते. 
" दोघींनी मिळून बनवली आहे." दुसरी बाई म्हणते, "वाटते तितकी सोप नाहीये, खरंच!!" 😁😅😅😅😅😅😅😂😂😂😂

Sunday, October 29, 2017

फराळाचा भुगा!!


टेबल पुसून झाल्यावर ६० वर्षांचे कृष्णराव बाजूच्या कपाटातल्या फाईल नीट ठेवत होते तेवढ्यात कॅबीनचा दरवाजा उघडला आणि रोहित साहेब, म्हणजेच रोहित जयवंत तावडे, आत आले. गेल्यावर्षी  त्यांच्या आई बाबांचे एका दुर्घटनेत अकस्मात निधन झाल्यामुळे त्यांना अमेरिका सोडून भारतात यावे लागले व आपल्या बापाने रचलेला २५ वर्षांचा व्यवसाय ३५ वर्षांच्या वयात पुढे चालवावा लागला.  ऑफिस मधली  हि त्यांची पहिलीच दिवाळी होती. आत येताच ते त्वरित खुर्चीवर बसले, आणि आपल्या टेबल वरच्या फोन वरून एक नंबर दाबला. "हॅलो...हा ढेरे साहेब...  हा सॉरी, अहो खरंच सॉरी मी  विसरलोच तुम्हाला फोने करायला, अहो तुमची दिवाळीतली  मिठाई आणि ग्रीटिंग पाहून माझी मुलगी खूप आनंदी झाली....  खूप खूप धन्यवाद! काही नाही आता मी निघतोय. मिटिंग ला बोलूया, शेवटी हा करोडोंचा कॉन्ट्रॅक्ट आहे, आम्ही गमावू शकतच नाहीत तुमच्या साऱ्या अटी मान्य आहेत आम्हाला. आजच फायनल करूया ,सौदा पक्का! ....  ओके साहेब भेटूया मिटिंग ला.....  बाय !" म्हणत त्यांनी फोन ठेऊन दिला.

बाजूला उभे असलेले  कृष्णराव रोहित साहेबांकडे पाहताच होते, " अरे कृष्णा जरा ती फा ०१ फाईल दे मला कपाटातून." साहेबांचे वाक्य ऐकून लगेच कृष्णराव फाईल शोधू लागले  पण ५ मिनिटे झाली तरी मिळेना. " काय कृष्णराव?  आता जमत नाही काम तुम्हाला... साठी ओलांडली, आराम करा घरी, एक फाईल शोधायला इतका वेळ लागतोय. माझी मिटिंग ची वेळ निघून जाईल जरा शोध या टेबल खाली असेल...हि घे चावी." म्हणत एका टेबलाकडे बोट दाखवले.  दिलेल्या चावीने उघडून कृष्णराव त्या टेबल खालच्या कपाटात फाईल  शोधू लागले, " माझे बाबा होते म्हणून चालायचे तुमचे.... आता कायद्याप्रमाणे रिटायर व्हायला हवे तुम्ही... मी अमेरिकेतून शिकून आलोय काम करून आलोय... भावना बाजूला ठेऊन काही निर्णय घ्यावे लागतात..."

कृष्णराव एक फाईल काढू लागला तेवढ्यात गचकन एक पिशवी खाली पडली... त्यात कृष्णरावने दिवाळी आधी दिलेला फराळ होता...  जमिनीवर सांडून त्याचा भुगा झाला , " अरे कृष्णा हे काय? अरे ती पिशवी खाली पाडलीस....  कचरा झाला सगळा.. साफ करून घे.... आता मी निघतोय मला मिटिंग आहे ..... " हे म्हणत फाईल घेऊन रोहित साहेब निघून गेले.

पण  ह्या घटनेने फराळाचा नाही तर एका मनाचा भुगा झाला होता...आपल्या नातीने बनवून दिलेले दिवाळी ग्रिटिंग सुद्धा अजून कपाटात पाकिटात बंद पडलेय या टेबलाखाली... हे पाहून मनाचा चुराडा झाला होता. जयवंत साहेब असते तर आज त्यांनी आपला फराळ "बेश्ट हाय !!" म्हणत दाद दिली असती... नातीला खोटे सांगावे नसते लागले " बाळ  तुझे ग्रीटिंग पाहुन साहेब खूप खुश झालेत!!" साहेबांनी तिला गेले काही वर्ष भेट म्हणून  दिलेली मोठी टॉफी आज मलाच न्यावी लागेल... आज पासून इथे परत यायचे नाही... तनाने नाही तर मानाने रिटायर होतोय मी जयवंत साहेब..... माफ करा मला!.. असे मनात म्हणत कृष्णराव अश्रुंचे घोट पित कॅबिन बाहेर निघून गेले.

कळत-नकळत आपल्या दैनंदिन जीवनात हे रोज घडते. कोणाची पाच रुपयांची सुद्धा भेट हि मनाला आनंद देणारी असली पहिले कारण त्या पाच रुपयात सुद्धा त्या व्यक्तीचा अनमोल वेळ व श्रम असतात आणि सर्वात महत्वाच्या भावना .... अश्या व्यक्तींना फक्त गरज असते आपल्या प्रतिसादाची... तेच द्यायचे राहून जाते.


Sunday, March 6, 2016

पप्पांचे व्हाटसप!! पप्पांचे फेसबुक!!


" चार दिवस झाले, यामी नीट  खात नाही, पीत नाही, निट बोलत नाही. परीक्षा चालू आहे, पण अभ्यासात तिचे  मन लागत नाही. आज मी तिला संध्याकाळी विचारते काय झाले आहे नक्की?  अशी का वागतेस?  आता आठवीत गेली, मोठी झाली, शाळेत कोणी ओरडले, कोणी मुलानी वगैरे काही त्रास तर दिला नाही तिला?  " आपल्या  मुलीबद्दल असे असंख्य विचार इशाला सतावत होते वं  ऑफिसच्या कामात तिचे मन लागत नव्हते.

संध्याकाळी घरी आल्यावर, यामी आणि इशा चहा घेत होते तेव्हा ईशाने ठरवल्या प्रमाणे विषय काढाला, "हे बघ यामी,  आत्ता घरात फक्त तू आणि मी आहोत, तुझ्या मनात नक्की काय चाललय, मला कळू दे. आई आहे मी तुझी मला सांग. मन मोकळे कर. नेहमी बडबड करून मला, दादाला आणि पप्पांना सतावणारी यामी कुठे हरवली आहे का? इतकी शांत का? मला त्रास होतोय बाळा. दादा आणि पप्पा घरी नाहीत तू मला आत्ताच सांग काय कारण आहे?"

यामी थोडा वेळ नजर खाली टाकून शांतच राहिली. मग थोड्यावेळाने तिने आपल्या आईकडे अश्रू पुसत आपल्या शांततेचं  कारण सांगू लागली "आई पर्वा  मी पप्पांचा मोबाईल घेतला होता, आता मला कळले ते मला मोबाईलला हात का लावू देत नाही…. " एवढे म्हणून ती अजून रडू लागली.

"अगं  यामी, शांत हो !! काय बोलायचं पूर्ण बोल घाबरू नकोस." इशा ने तिला बोलण्यासाठी प्रोस्त्साहित केले.

"मी पप्पांचे वॉट्सप (watsapp ) पाहिले त्यात एका स्त्रीचे  खूप घाण चित्रीकरण होते. पण  त्यामुळे  मी इतकी दुखावले गेले, पप्पांनी त्या चित्रावर लिहिलेल्या घाण टीका वाचून मला घृणा आली आहे. एवढेच नाही आई,  मग मी कुतूहल म्हणून  पप्पांचे फेसबुक(facebook ) पण पहिले, त्यात पण पप्पांनी अनेक स्त्रियांशी घाण गप्पा मारल्या आहेत." एवढे बोलून ती हुंदका देऊन रडू लागली,  " मला पप्पांची घाण वाटतेय. मला राग आलाय. काय करू मी? अभ्यासाला बसते  तेव्हा पण हेच डोक्यात येते, आपले पप्पा असे आहेत. शी!! आत्ताच्या परिस्थितीत मुलींना सुरक्षित कसे ठेवावे या विचाराने  प्रत्येक बापाचे हृदय धडधडत असेल ना? पण माझे पप्पा असे का वागले? ते माझे रक्षण करू शकतील ना? जर त्यांचेच विचार इतके हीन आहेत, तर मी या समाजात असलेल्या प्रत्येक पुरुषाकडून काय अपेक्षा करू? आई, शाळेतून येता जाता अनेक पुरुष माझ्या समोरून जातात, कुणाचे डोळे तर कुणाचे हात रोजच माझ्या शरीराचा मला राग येईल अशी हरकत करत असतात, पण मी नजर अंदाज करते आणि मुकाट्याने सहन करते, कारण त्या पुरुष म्हणवून घेणाऱ्या पुरुषांशी माझा काही एक संबंध नाही. पण पप्पांना मी कसे नझर अंदाज करू? त्यांना कसे विचारू? " इतके बोलून यामी ढसा- ढसा  रडू लागली. तिच्या मनावर परिणाम झाला होता.

 ईशावर यामीच्या  प्रश्नांची वीज कोसळली होती. ती निरुत्तर झाली होती.

खरच  या टेक्नोलोजीच्या युगात, आपल्या विचारांना, वागण्याला आता काही कुंपण राहिले नाही, टचस्क्रीन वर टच  करून  आपण रोज अनेक विनोद, विचार, चित्र , एक मेकांशी वाटतो, पण आपल्या आजू बाजूला असलेल्या व्यक्तींच्या मनाला स्पर्श होईल असे वागतोय का? याचे सुद्धा भान ठेवले पाहिजे.